हे गुरुदेव !
प्रात : स्मरण !
उठा गड्या ! अरुणोदय झाला
श्री सद्गुरुच्या ज्ञानाचा /
सोडा काम - विकार बिछाना
नाश करा अज्ञानाचा // धृ. //
बघा अंबरी पक्षी बरळती
विवेक बोधाची दाटी
वैराग्याची लाली निघाली
आर्तांच्या जिवनकाठी // १ //
भक्ति-फुवारे झुळझुळ उडती
प्रेमाच्या वायु-किरणी /
साक्षिराज तो अलख जागवी
हाक देई दारावरुनी // २ //
क्षमा-शांती अजी ! दया-गोधने
वृत्ति-वत्स घेउनि निघती /
अनुभव-शिखरी जाति चराया
अगमनिगम-चारा बघती // ३ //
श्रद्धेचा दरवाजा उघडा
या श्रृतिस्मृतिचे वैराणी /
तुकड्यादास म्हणे जागृत व्हा
नका करु ही वेळ उणी // ४
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा