रिझवू सद्गुरुरायाशी
याहो या ! सर्वही मिळोनी
रिझवू सद्गुरुरायासी /
स्वधर्म जागृत करु आपुला
लागु या व्यवसायासी // धृ. //
परधर्माला टाकुनि मागे
भय सारे हरवू अपूले /
ज्ञान-शास्त्र हे घेऊनि हाती
दूर करु असले-नसले // १ //
ब्रम्हचर्य व्रत नीति नियम हे
सांभाळुनि जगती पाहू /
असले नसले दु:ख सोसुनी
निर्भय मनि होऊनि राहू // २ //
सत्याची अंतरे सुखविण्या
कष्ट सदा शरिरी वाहू /
सर्व जगाचा चालक तो प्रभु !
प्रेमाने त्याला गाऊ // ३ //
तुकड्यादास म्हणे न घडे तरि
सद्गुरुला पुसण्या लागू /
भक्ति बळाने एकवटूनिया
या अपुल्या स्वरुपी जागू // ४ //
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा