देवाचा अवतार
मना भासे गजानन! हा
खरा अवतार देवाचा /
कराया कार्य जनतेचे
प्रगटला मानवी साचा // धृ. //
कुठे श्रीकृष्ण! होऊनी
कुठे श्रीराम होऊनी /
कुठे नरसिंह! होऊनी
प्रगटतो नाथ प्रेमाचा // १ //
कुठे ज्ञानेश गुरु ! झाला
कुठे तुकया! म्हणो आला /
कुठे शेगांवी अवतरला
असा अवतार क्रम त्याचा //२ //
कुठे तो विश्वची नटला
कुठे सौंदर्यवत् झाला /
तयाची अगम्य ही लीला
कथाया खुंटते वाचा // ३ //
म्हणे तुकड्या प्रभू भक्ता
न भासे भेदची पहाता /
तयाची सर्वची सत्ता
हरी नटला गमे साचा // ४ //
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा