सदगुरु दर्शन
सदगुरुनाथ गजानन ! ध्याता
हरपे मन कामना /
अनुभवे कळती सकळा जना // धृ. //
निसंग वृत्ती,प्रबळ प्रदिप्ती,
रंग सावळा भला /
नाथ शेगांवी प्रगट जाहला //
किती सांगु गुण सद्गुण त्यांचे
न कळे कळणी भला /
स्मरण हे करिता तारिल मला //
अपार किर्ती जगी जयाची
चमत्कार निर्भडि /
अनुभव येती पुढच्या पुढे //
( अंतरा )
राहती नग्न निर्भयचि वरी पाहता /
करी चिलीम काम क्रोध ही दिसे तत्वता
वरी ज्वाला आत्मज्योतही चमकते सदा /
पंचविषय हा गांजा ओढीत
राही ब्रम्ह - भुवना /
अनुभवे कळती सकळा जना // १ //
आठवता ते नाम तयाचे
संशय सारा पळे /
चित्त अंतरंग वळणी वळे /
निराधार राहणी जयाची
ऊर्ध्वदृष्टि आढळे /
नखशिखी आत्मरंग झळझळे /
आत्मज्ञानी खरे सद्गुरु
अंतर-वृत्तीही कळे /
ओळखी घेती जन विरळे /
( अंतरा )
नच कधी कार्य साधता पाहीले कुणी /
नच कधी बहिरंगता पाहिले कुणी /
नच कधी कुणा बोलता पाहिले कुणी /
लहर प्रसंगी शब्द काढता
अमोल वाटे मना /
अनुभवे कळती सकळा जना // २ //
मानपान नच कांही ठेविला
राही विरळेपणी /
विरक्ती वाढे सकला जनी /
सिद्ध बोलणे कधी चुकेना
अक्षय वेदी धुनी /
न मागे हाती छदामी कणी //
( अंतरा )
दर्शना लोक-दाटणी आली पहाता /
सद्वृत्ती अधिक पाहूनी चढे स्नेहता /
दे प्रसाद, होई धन्य जगी राहता /
विरळ्यावरी कर कृपा ही /
तुकड्या म्हणे देई सद्गुणा /
अनुभवे कळती सकळा जना // ३ //
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा