सद्गुरु दिसले डोळा वो !
अवचित आली वेळा बाई !
सद्गुरु दिसले डोळा वो /
काय वाणु मी रुप तयांचे ?
चहु वर्णाचा गोळा वो // धृ. //
सहजासनि बैसली उगी मी
एकांती नीज ध्यानी वो /
झिलमिल-झिलमिल रुप दाविले
जैसे मृगजळ पाणी वो //१ //
रक्त वर्ण नेसुनी सोवळे
शुभ्रवर्ण अंगरखा वो /
अंगरख्यावर चमके जैसा
श्यामवर्ण तो बुरखा वो // २ //
बुरख्याच्यावर ऊर्ध्वगतीचा
सुंदरसा एक जरखा वो /
मधि सद्गुरुचे तेज फाकले
कोटी रवि शशि सरिखा वो // ३ //
नेत्राची बाहुली फाकली
नेत्रपणा मग गेला वो
जिकडे तिकडे सद्गुरु साक्षी
दृष्टी-गोंधळ मेला वो // ४ //
तुकड्यादासा दासपणाचा
ठाव नुरेसा झाला वो
श्रीगुरुच्या स्वकृपे मिळाला
निज-चरणाचा प्याला वो // ५ //
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा