अतर्क्य गुण नांदले धन्य धन्य श्रीसंत गजानन ! शेगांवी प्रगटले - राष्ट्रसंत तुकडोजी श्री तुकडोजी महाराज भजन
अतर्क्य गुण नांदले
धन्य धन्य श्रीसंत गजानन !
शेगांवी प्रगटले |
अनुभवे येती जगाला भले || धृ. ||
देही असुनी विदेह स्थितिचे
दाखवती दाखले |
पाहता जन नेत्री चांगले ||
अपूर्व योगी परमहंस हा
पाहता मन रंगले |
सोडू ना वाटतसे पाउले ||
( चाल )
शेगांव नगर दुमदुमे जशी पंढरी |
जन अफाट येती भाविक बारी करी |
राजे महाराजे लोळति चरणावरी |
नग्न दिगंबर योगीराज !
हे सद्भक्ता पावले |
अनुभवे येति जगाला भले || १ ||
लहर ज्यावरी झाली कृपेची
सुदैव त्या लाभले |
अवकृपे वंश नाश पावले ||
तीर्थ-प्रसादे मरणोन्मुख जे
ते रोगी उठविले |
औषधीविना सिध्दि पावले ||
शब्दमुखांतुनि निघे जणूं ते
दैवि बाण सोडले |
सत्यची होति न कधिंही ढळे |
( चाल )
सामर्थ्य जयाचे अगाध वाटे किती |
अग्नीविण चिलिमीमधीं धूर काढिती |
जन असंख्य ऐशा लीलेला पाहती |
सद्भक्तांना ब्राम्हणरुपे
क्षेत्री दर्शन दिले |
अनुभवे येति जगाला भले || २ ||
पाण्यविण एक विहिर कोरडी
पाणी न लागे तिला |
संत हा अचूक तै लाभला |
कृपादृष्टिने लहर फिरविता
ओहटा तै पावला |
झरा बाहेरि वाहू लागला |
जला बंब ती विहिर कोरडी
खूष धनी जाहला |
करी लोटांगण पायी भला ||
( चाल )
धन्य हा औलिया | विदेह जनकापरी !
राहतो कुठेहि खातो चुन भाकरी |
जाऊन पाणी पीतसे नालियावरी |
अनासक्त हा जगती राही
लोक पाहती खुले |
अनुभवे येती जगाला भले || ३ ||
जरा द्रोह ना मनीं मारती मुले ऊस घेऊनी |
हासती धन्य धन्य म्हणवुनी ||
छळती नानापरी लेकरे अति उर्मट होऊनी |
जरा ना क्रोध तयाचे मनी ||
खेळति कुस्ती धावुनि पोरे
कठिणचि वज्राहुनी |
भासले संत गजानन मुनी ! |
( चाल )
हरुनिया गर्व तैं पायी सर्व लोळती |
किती तरी किर्ति ही त्यांची दिगंताप्रती |
काय मी सांगू हो ! न चाले माझी मती |
तुकड्यादास म्हणे संताचे
अतर्क्य गुण नांदले |
अनुभले येति जगाला भले || ४ ||
जय गजानन माऊली
उत्तर द्याहटवा