लहानुदास श्री. दिगंबर पाटील चौधरी देऊरवाडी ता. दारव्हा जि. यवतमाळ यांच्या जीवन प्रवासातील चित्तथरारक प्रसंग.....
२) क्षणात निसर्ग चक्रात बदल करणारा लहानुजी बाबांचा परमोच्च कोटीचा अधिकार..
सन १९७० मध्ये देऊरवाडी (लाड) ता. दारव्हा जि. यवतमाळ येथील लहानुभक्त श्री. दिगंबर पाटील चौधरी हे नेहमीच्या टाकरखेड वारीला आर्वी येथुन पायी चालत निघाले. पावसाळा संपल्यानंतरचा काळ होता. चालता चालता वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लहानुबाबांवर लिहिलेल्या एका भजनातील ओळीचे त्यांना स्मरण झाले. त्या भजनात राष्ट्रसंत लहानुजी बाबांच्या सामर्थ्याचे वर्णन करतात
तू वैद्य राज से वैद्य बडा | तेरे मिट्टी मे भारी दुआ चमके || लहानुजी नाम तो छोटा है । पर काम तेरा अस्मान डरे ||
या वर्णनाबद्दल चौधरीजींच्या मनात शंका प्रगट झाली कि खरोखरच हे खरे असेल काय? लहानुजी बाबांना आभाळ भिते काय? हा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला.
दिगंबर पाटील असा विचार करत करत टाकरखेड्याच्या जवळपास पोहचले अगदी थोड्याच अंतरावर मंदिर परिसर राहला होता.
निसर्ग वातावरण पहाता अतिशय स्वच्छ असे वातावरण होते. पाऊस येण्याची यत्किंचीतही शक्यता नव्हती. त्याच क्षणी अचानक हवा सुटली, ढग जमा व्हायला लागले केसरी पाऊस सुरु झाला विजा चमकायला लागल्या. आताचे जे बसस्थानक आहे त्या ठिकापासुन निसर्गाने उग्ररुप धारण केले व गडगडाट व्हायला सुरुवात झाली. दिगंबर पाटील महाद्वाराजवळ पोहताच आणखीनच कडकडाट
सुरु झाला.
सध्याचे जे लहानुजी बाबांचे दैनंदिन वापरलेल्या वस्तू ज्या ठिकाणी ठेवल्या आहेत त्या ठिकाणी बावाजी बसलेले होते. आणि समोरच्या ओट्यावर दोन म्हाताऱ्या व्यक्ति बसलेल्या होत्या. दुपारची वेळ होती. दिगंबर पाटील जसे महाद्वारातील पायऱ्या चढले तसाच आकाशात प्रचंड आवाज झाल्यामुळे ते दोन्ही म्हातारे कानात बोटे घालुन निघुन गेले त्यांना तो आवाज सहन झाला नाही. आणखी पाटील दोन पावलं चालल्यावर भयानक आवाज झाला त्याचक्षणी लहानुजी बाबा बसलेले असतांना उभे झाले व नजर आकाशाकडे टाकुन शिव्या द्यायला लागले " मघापासुन लय येलुन राह्यला ; गंमतच पाहुन राह्यलो, माजला का? " अशा शिव्या आभाळाकडे पाहुन बाबांनी दिल्या. त्याच वेळेला हवा गेली; पाणीही गेलं: विजांचा गडगडाटही थांबला व आभाळ स्वच्छ झाले चक्क ऊन पडले.
दुसऱ्याच क्षणाला बावाजींनी दिगंबर पाटलाकडे बघीतले व म्हणायला लागले कि " तुकड्या बुवानं बरोबर लिहलं का? नाही तं तपासुन पाहावं? "
त्याच वेळी दिगंबर पाटील काहीएक न बोलता बावाजीच रुप पाहुन त्यांना थरकाप सुटला व मनात विचार सुरु झाले कि " मी काय तपासु तुम्ही काहीच नव्हतं तर निर्माण केलं हवा सोडली, पाणी आणलं, गडगडाट केला आणि त्याला धमकावुन क्षणात गायब केलं "
एवढा सगळा खेळ केल्यावर मी काय तपासु असा विचार पाटील करीत होते.
या प्रसंगापासुन पाटलांचा दृढ विश्वास बावाजीं प्रती निर्माण झाला.
१९६७ पासुन अविरत दर्शनाला येणाऱ्या दिगंबर पाटलांच्या आयुष्यात अनेक अनुभव साक्षात्कार घडले आहेत. आजही वयाच्या ८१ व्या वर्षी सुद्धा ते बावाजीच्या दर्शनाला येतात.
आद्य ग्रामगीताचार्य रामकृष्णदादा बेलुरकर हे त्यांचे जीवलग मित्र. दादांनी त्यांच्याकडे बरेचदा बावाजीच्या प्रचार दौऱ्यावर असतांना देऊरवाडीला मुक्काम केला.
आज वर्षातुन दोनदा देऊरवाडी येथुन लहानुजी बाबांची पायदळ पालखी येत असते. त्यांच्याकडे बाबांचे एक छोटेसे मंदिर सुद्धा आहे. लहानुदास श्री दिगंबर पाटील चौधरी हे बावाजीच्या साहित्याचा सतत प्रचार करत असतात. लहानुजी लीलामृत वाचनातून बावाजीचे चरित्र उलगडुन सांगतात त्यांच्या तेजस्वी वाणीमध्ये लहानु नामाचा जणू अखंड जपच सुरु असतो. आजच्या स्थितीत देऊरवाडी येथे दरवर्षी बावाजीचा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या ऊत्साहात गावकरी साजरा करतात.
संपुर्ण गावचं लहानुमय झालेलं आहे. असाच एक प्रसंग त्यांच्या शेतीच्या बाबतीत लहानुजी लीलामृत मध्ये आलेला आहेच त्यातुन सुद्धा त्यांना बावाजीने बाहेर काढले. याही वयात त्यांचा बावाजीच्या सेवा कार्यात सहभागी होण्याचा ऊत्साह, जिद्द व चिकाटी वाखाणण्यासारखी आहे. ते नेहमी सांगत असतात कि बाबा माझे सखा आहे, सद्गुरु आहे, परब्रम्ह आहे, परमेश्वर आहे मायबाप आहे व कुलदैवत सुद्धा आहे एवढी दृढ निष्ठा त्यांची बावाजीवर आहे. अगदी साधी राहणी सडपातळ बांधा असलेले बावाजीची निष्काम सेवा करणारे आमचे दिगंबर पाटील चौधरी म्हणजे आम्हाला लहानुबाबाचं भासतात.....
जय लहानु परमेश्वरा !!!
संदर्भ :-

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा