श्री संत लहानुजी महाराज ; टाकरखेड ता. आर्वी जि. वर्धा
जीवन - परिचययोगी आत्मालापी निजसंवादी ।
विदर्भभाषी अंतर्ज्ञानी |
लहानुजी गमती ||
विसाव्या शतकांतील वैदर्भीय संतमंडळीत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीसंत लहानुजी महाराजांनी श्रावणी पौणिमेस (दि. ६ ऑगस्ट १९७१) या मृत्युलोकाचा निरोप घेऊन निजधामी गमन केले ! त्या चंद्रग्रह्णाच्या दिवशी दुपारी १ वाजून ५५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत अनंतात विराम पावली ! जिवाजिवांना उत्क्रान्ति- पथावर आरूढ करण्याचे, त्यांच्या प्रगतीचा सोपान निविघ्न करण्यासाठी श्रमपूर्वक झिजण्याचे आपले सत्कार्य अखेरच्या श्वासापर्यंत करीत, रक्षाबंधनाच्या पवित्र दिनी त्यांनी 'आम्ही जातो अमुच्या गावा । अमुचा रामराम घ्यावा' या भावनेने इहलोकीचा निरोप घेतला ! जगत् हितार्थ निरलसपणे कष्टणारा एक पुण्यात्मा या मृत्युलोकावरील आपला विहार संपवून-पूर्ण करून अनंतात विराम पावला !
लहानुजी महाराज गेले ! आतां त्यांची ती पावन वाणी, परमार्थ- पथावर मार्गदर्शक ठरणारी त्यांची ती लोकविलक्षण अस्सल वऱ्हाडी मराठमोळी वाणी पुन्हा ऐकू येणार नाही ! त्यांची ती मर्मभेदक दृष्टि, जिवाची सारी मलिनता क्षणार्धात धुवून काढणारी त्यांची ती कृपामय दृष्टि आता पुन्हा कधी पहायला मिळायची नाही !
विदर्भ ही तर संतांची भूमि ! इथल्या पावन मातीने अनेक पवित्र नि दिव्य जिवांना जन्म दिला. कितीतरी साधु-सत्पुरुषांच्या जन्माने या वऱ्हाडी भूमीची कूस धन्य झाली आहे ! पुण्यात्मा श्री गाडगे बाबा याच भूमीतले ! अगदी अलीकडे याच भूमीने राष्ट्रसंत तुकडोजीसारख्या जगदोद्धारक जीवनाचा विश्वक्षितिजावर उदय केला.
अमरावती जिल्ह्यातील चांदूर तालुक्यांत संत मायबाई समकालीन श्री बगाजी महाराज ज्या मंगरूळ ग्रामी रहात असत त्याच गांवी भांडे नांवाच्या कुळात श्री लहानुजींचा जन्म इ. स. १८८० साली फाल्गुन शुद्ध द्वितीयेला झाला. श्री. अभिमानजी भांडे हे त्यांच्या पित्याचे नांव व मातेचे नांव होते भीमाबाई. एकोणिसाव्या शतकांतील सुप्रसिद्ध खग्रास सूर्य- ग्रहणाच्या समयास श्री लहानुजी अवनीवर अवतरले होते. लहानपणीच ते मातापित्यास मुकले. त्यांचे मामा श्री. बारकाजी ठाकरे हे नागपूर जिल्ह्यांतील रिधोरा गांवी रहात असत. त्यांचे एक नातलग श्री. ठवळी हे वर्धा जिल्ह्यांत आर्वी तालुक्यांत टाकरखेड येथे रहात. त्यामुळे आपल्या मामांबरोबर श्री लहानुजी लहानपणीच टाकरखेड्याला आले. तेथे ठाकरे मामा श्री. बापूराव बळीरामजी देशमुख यांची शेतीभाती करून आपला उदरनिर्वाह करीत असत. लहानुजींचे थोडेसे प्राथमिक शिक्षण या टाकरखेड्यांतच झाले.
टाकरखेड हे वर्धा ( वरदा ) नदीच्या तीरावर वसलेले एक छोटेसे गांव ! पैलतीराला धामंत्री तीर्थ असून तेथे एक मोठे शिवालय आहे ! पूर्वी तेथे काशीचे एक महंत श्रीइतवारगीर महाराज हे कैक वर्षे रहात असत. लहानगा लहानु त्यांच्याकडे जाऊन पाणी भरणे, मळा राखणे, अशी कामें करी. त्याच्या आवडीचेच ते काम होते. मधून मधून काशीकडून आलेला नागे लोकांचा तांडा टाकरखेड मार्गे धामंत्रीला जात असे. लहानग्या लहानूने त्या तांड्याचा तपास लावून पिच्छा पुरविला. आणि एक दिवस त्यांच्यासमवेत तो तीर्थयात्रेसाठी निघून गेला. त्यांच्याबरोबर त्याला चारोधाम तीर्थयात्रा घडली. सत्संगाचे, साधकीय जीवनाचे एक तप बाहेर घालविल्यावर पुनश्च लहानुजी टाकरखेड्याला आले. टाकरखेडच्या आसपास वरदापात्री (वर्धा) विहार करू लागले. राहिली साहिली योगसाधना पुरी करण्यासाठी मग ते अकोला जिल्ह्यांतील सस्तीवाडेगांव येथे वनविहार करणास योगी लालगीरबुवा यांच्याकडे गेले. श्री लालगीर महाराजांनी एकदा प्रसन्न होऊन त्यांना वैराग्याची दीक्षा दिली. तेथे कांही दिवस योगसाधना करून पुनश्च ते टाकरखेडद्यास आले. श्रमजीवी
जीवनाची त्यांना विलक्षण आवड. ते टाकरखेड्याला आल्यावर गावक-यांच्या शेताची राखण करण्याचे काम आपणहून व आवडीने करीत. त्यांचे बाबळेपण पाहून त्यांचा आध्यात्मिक अधिकार मात्र लोकांच्या त्यावेळी लक्षात आला नाही.
१९३२ सालची गोष्ट ! टाकरखेड्यास कै. गोविंदराव कडूंच्या माजघरांत श्रीसंत मायबाईची एक नाम समाधी आहे. तिचा वार्षिकोत्सव मे ( वैशाख ) महिन्यांत असे. कायदेभंगाच्या काळांतील एका उत्सवांत श्री तुकडोजी महाराजांचे खंजिरी भजन आयोजित करण्यांत आले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी गांवांतील त्या गल्लीतून श्री लहानुजींचा फेरफटका झाला. दोन संताची दृष्टादृष्ट झाली. दोघेहि श्रीसंत आडकुजींच्या कृपाप्रसादाने वाढलेले. राष्ट्रसंतांपेक्षा लहानुजी वयाने सुमारे पंचवीस वर्षांनी मोठे. लहानुजी बाह्यात्कारी जरी 'अणोरणीयान्' भासले तरी अंतर्यामी कसे 'महतोमहीयाम्' आहेत हे राष्ट्रसंतांनी त्या दिवशी प्रथमच गांवकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांचा यथार्थ परिचय त्यांनी टाकरखेड निवासीयांना करून दिला. पुढे स्वेच्छेने श्री लहानुजी महाराज गोविंदराव कडूंच्या गोठयांत राहू लागले. श्री. गोविंदराव हेच त्यांचे आद्यनिष्ठ भक्त. तत्पूर्वी त्यांच्या दर्शनार्थ त्यांचे समवयस्क मित्र वरखेडचे श्री. दौलतराव बेलूरकर श्री. शेषराव बोके व आर्वीचे अध्यापक 'सत्यमार्ग प्रदीप' कार कै. बाळकृष्णपंत पाबळे हे जात असत. लहानुजींची साधकावस्था या सर्वांनी पाहिली होती.
त्यांचे गोठ्यातील जीवन कसलेल्या कास्तकाराचे असे. त्यांना श्री. कडूंच्या घरचे भोजनाचे ताट येई. जेवण झाल्यावर आपले ताट ते स्वतःच स्वच्छ करीत. एकदा दोन्ही हात दोराने घट्ट बांधून ठेवून घेऊन त्यांनी अलौकिकपणे जेवण केल्याची गोष्ट सर्वांनी अनुभवली आहे. त्यांची वाणी अस्सल व-हाडी होती. त्यांचा वेषहि व-हाडी कास्तकारासारखा (शेतकऱ्यासारखा) असे. धोतर, पांढरा सदरा व पांढरी टोपी ते वापरीत. त्यांच्या या सर्वसामान्य दर्शनाने प्रथमतः त्यांची अलौकिकता येणाऱ्या
लोकांना मुळीच जाणवत नसे. एखाद्या श्रमशील कृषकाच्या संवयीच त्यांना अखेरपर्यंत होत्या.
श्री लहानुजी महाराजांना सद्गुरु कृपाप्रसाद लाभला तो वरखेड- निवासी शिवस्वरूप श्री आडकोजीनाथांचा. त्यांची कायाक्लेशात्मक यौगिक साधना अत्यंत कठोर होती. 'शिवस्वरोदय' हें त्यांच्या साधनेचे नांव. आपल्या सद्गुरूंना ते नेहमी म्हणायचे की, मला आपणासारखे करून टाका. त्यांचा हा हट्टच असे आपल्या गुरुदेवाजवळ. आणि मग परब्रह्मस्वरूप आडकोजींनी एकदा त्यांना आशीर्वाद दिला. श्री लहानुजींच्या गुणवर्णनपर केलेल्या 'स्तवनामृत' ग्रंथांत याचे वर्णन आहे.
म्हणती तुम्हासमान मज करा ।
तूं मोक्षसुखाचा दातारा ।
न सोडी हा चरण सहारा ।
कृपा प्राप्त होईपर्यंत ।।
दिले समर्थानी वरदान ।
होशील तूं मजसमान |
दिगंती होईल तुझा मान ।
तुज पुजतील ईश्वरभावे |
भावी संतमंडळांत तूं मार्तंड ।
तुझे जीवन होईल उदंड |
कार्यहि घडेल फार ।
गगनाहुनी थोर ते ॥
सद्धर्माचा प्रसार नि प्रचार करण्याचे श्री लहानुजींचे कार्य टाकरखेड्यांत बसूनच त्यांनी अखेरपर्यंत केले. त्यांचा आध्यात्मिक अधिकार आगळाच होता. ते रात्रंदिवस स्वतःला संबोधून 'काय रे लायन्या....' असे म्हणत बोलत. भिंतीकडे तोंड करून ते बसलेले लोकांना आढळत. पण त्यांचा स्वरसृष्टीतला विहार अखंड गतिमान होता. त्यांच्या दर्शनाला विदर्भ, नागपूर व महाराष्ट्रातीलहि अनेक लोक जात. त्यांच्या दर्शनाने आणि प्रसादाने कितीतरी लोकांच्या आधिव्याधि दूर झाल्या आहेत. अशी शेंकडों उदाहरणे त्यांचे चरित्र लेखक श्री. रा. मो. बेलूरकर आद्य 'ग्रामगीताचार्य' यांनी आपल्या, 'श्री समर्थ लहानुजी महाराजांचे जीवन-दर्शन' या ग्रंथांत संग्रहित केली आहेत.
श्री लहानुजींनी आपल्या ९० वर्षाच्या दीर्घ आयुष्यांत अनेकांचे दुःसाध्य रोग केवळ तीर्थ आणि अंगा-याने बरे केले. वर्धा ( वरदा ) नदीच्या पुरापासून गांवांना वाचविले, अनेकांच्या मनोव्यथा कृपाकटाक्षाने नाहींशा केल्या. जीवनांतील पुढील होणाऱ्या घटना दाखवून लोकांना वेळीच सावध केले. आपल्या हातांतील सोट्याने मार देऊन अनेकांना सन्मार्गाला लावले. दर्शनासाठी आलेल्या माणसाचे मनोगत ते केवळ त्या माणसाच्या पडलेल्या छायाकृतीवरून ओळखीत. रोकड्या शब्दांत ते त्याला जे उत्तर, देत ते ज्याचे त्यालाच कळे. जमलेल्या इतर दर्शनार्थीसाठी महाराजांचे बोलणे म्हणजे फक्त गूढच रहात असे. आलेल्या माणसांनी कोणताहि प्रश्न न विचारता त्यांच्या अंतर्यामीच्या शंकांची आणि संकल्पांची रूपे श्रीलहानुजींना अगदी स्वच्छ दिसत असली पाहिजेत. कारण त्यांना अनुसरूनच त्यांचे मार्गदर्शन सहजपणें लोकांना लाभत असे.
टाकरखेडला येणाऱ्या लोकांची संख्या गेल्या २० / २२ वर्षात खूपच वाढली होती. १९६४ च्या सुमारास वंदनीय राष्ट्रसंतांनी आपल्या गुरुबंधूच्या दर्शनार्थ येणा-या लोकांची सोय व्हावी म्हणून श्रो लहानुजी महाराज रहात होते त्या ठिकाणी एक आश्रमवजा बांधकाम करवून घेतले, आलेल्या भाविकांसाठी एक धर्मशाळा, श्री महाराजांसाठी स्वतंत्र दोन खोल्या तेथे बांधल्या गेल्या. सेवकांनी एका खोलीत आपले कार्यालय थाटले, 'गुरुप्रसाद' नांवाचा महाराजांच्या स्तुतिपर कवनांचा संग्रह सेवकांच्या संस्थेने प्रकाशित केला. श्री लहानुजीचे मराठी व हिंदी भाषेत चरित्र प्रसिद्ध झाले. त्यांचा ओवीबद्ध चरित्रग्रंथ वरखेडवासी श्री. रा. मो. बेलूरकरजीने लिहिला, या छोट्याशा आश्रमांत सामुदायिक प्रार्थनेच्या उपक्रमासह अनेक समाजकल्याणार्थ उपक्रम चालतात.
'जगांत पिशाच अंतरों शहाणा ।
सदा ब्रह्मीं जाणा निमग्न तो ।।’
अशा शब्दांनीच श्रीलहानुजींच्या अवस्थेचे वर्णन करावे लागेल आध्यात्मिक दृष्टीने त्यांची परंपरा त्यांच्या चरित्रग्रंथांत जी दिली आहे ती अशी की - आदिनाथ चिरंजीव श्री गुरुदत्त महाराज (केदारनाथ) मच्छिद्रनाथ-गोरखनाथ-गहिनीनाथ-निवृत्तिनाथ-ज्ञाननाथ (ज्ञानेश्वर) व यांच समाधीमधून मंत्र मिळालेले श्री. हैबतबाबा (पंढरीला आज येणाऱ्या दिंडीच्या पद्धतीचे जनक ) व नंतर याच माळेत आर्वीच्या संत मायबाई त्यांचे शिष्य श्री आडकुजी महाराज व त्यांचेच अनुग्रहीत श्री लहानुजी महाराज.
'जे आपुलिया भागां आले । ते आचरी विधिगौरवे ।।'
ह्या श्रीज्ञानेशोक्तिप्रमाणे श्री लहानुजी महाराजांनीं आपले सेवामय जीवनपुष्प विश्वात्मक श्री गुरुदेवांच्या चरणीं भक्तिभावाने समर्पित केले. विदर्भ प्रांतातील वर्धा जिल्ह्यांतल्या टाकरखेड नामक एका लहानग्या गांवांत व आसपास लहानुजी विहरले. धर्मप्रसार-प्रचारासाठी त्यांनी आधुनिक जगांतली कोणतीहि पद्धति अंगिकारली नाही. कोणता संप्रदाय अगर संस्था निर्मीली नाही. ( असंप्रदायीक संत ) त्यामुळे त्यांचे नांव पश्चिम महाराष्ट्रांत व अन्य प्रांती खूपच अपरिचित राहिले. पण म्हणून कांही त्यांच्या कार्याचे महत्त्व सीमित होत नाही-कमी होत नाही.
या संतशक्तीचे एक लोभसवाणे रूप म्हणजे श्री लहानुजीबाबा ! आतां त्यांचे ते निरामय जीवन पंचतत्वांत विलीन झाले ! ते गेले त्यापूर्वीच्या आठवड्यात टाकरखेड्याला त्यांच्या आश्रमासमोर महायज्ञ चालू होता. यज्ञाची पूर्णाहुति होण्या अगोदर एक दोन दिवस ते पुन्हा आपल्या पूर्वीच्या गोठ्याच्या जागेत राहावयास गेले होते, श्रावणी पौणिमेला (दि. ६ ऑगस्ट ७१) यज्ञाची पूर्णाहुति होतांच त्यांनी सर्वांसमक्ष प्राणनिरोधन केले, आणि आपल्या सुदीर्घ जीवनाची पौर्णिमा साधली, शेवटचा दिवस त्यांनी असा गोड केला. त्यांच्या निर्वाणाची बातमी नागपूर नभोवाणीने त्वरित प्रसारित केली.
हजारो भाविकांची श्रीक्षेत्र टाकरखेड येथे गदीं उसळली. दुस-या दिवशी त्यांची रथात बसवून अंत्ययात्रा काढण्यात आली. वसिष्ठा (वरदा) नदीच्या पावन तटाकी ती महायात्रा विसर्जित झाली. भारवाडीचे संत भानुदास महाराज, पहूरचे संत श्रावण महाराज, सालबर्डीचे वयोवृद्ध संत मारुती महाराज, शिरसगावचे संत गजानन महाराज, वरखेडवासी ( भारवाडी ) संत सत्यबाबा, शेगांवपलीकडील काटेल मठाधिपति संत गुलाबवावा आदि संतमंडळी त्या महायात्रेत उपस्थित होती. सर्वांसमक्ष श्री. लहानुजी- बाबांचा आसनस्थ देह त्यांच्या कुटीसमोरील यज्ञकुंडात स्थापित करण्यात आला व मग त्यावर पायऱ्या पायऱ्यांनी समाधि बांधून पूर्णावली.
महाराज समाधिस्त झाल्यापासून प्रतिवर्षी नारळी पौर्णिमा ( रक्षाबंधन ) त्यांच्या पुण्यतिथीला भक्तांचा मेळावा भरत असतो.
पुर्वीप्रमाणेच प्रतिवर्षी फाल्गुन शु. द्वितीयेला महाशिवरात्रीच्या काळात सप्ताह साजरा होत असतो.
संदर्भ :- संत समागम

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा