// द्वय गुरुबंधु //
तुम्ही दूर पर्यंत दिवे लावाल !
श्रीसमर्थ लहानुजी महाराजांच्या भेटीस मधून मधून वं. तुकडोजी महाराज येत असत. या गुरूबंधूचे नाते नातेवाईका प्रमाणे नव्हते. वं. तुकडोजी महाराज व वरखेड क्षेत्रातील काही मंडळी मिळून टाकरखेडला आली. वं. तुकडोजी महाराज बाहेर दारावरच असतील तर आत लहानुजी महाराजांची हालचाल चालू झाली. दर्शनप्रेमीही आले होते. त्यांन काढून दिले. बाबांनी म्हटल्यावर कोणी थांबत नव्हते त्यांचे पुढे. कारण त्यांचे वाग्बाण म्हणजे "जब बाण छूटे शब्द के, लागे हृदयथरकापने।" (ल. ब.) पुष्कळांना महाराजांच्या शब्दांचा गोड व कटू अनुभव आल्याकारणामुळे त्यांचा शब्द सहसा कोणी मोडित नसे. त्यामुळे पुष्कळदा सेवकांची गरज न पडता योग्य वातावरण तयार होत होते. बाबा स्वगतच गुणगुणायला लागले. "आपले येथे तर आज कवी नारायण आलेत ! आदिनारायण आलेत !!" वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ते 'कवीनारायण' म्हणायचे. वं. महाराज आत गेले. समर्थास पुष्पमाला अर्पण केली. वं. तुकडोजी महाराजांचा हातधरून समर्थांनी आदर दृष्टीने खाली बसविले आणि सकुशल विचारू लागले.
"कसे काय येणे झाले?"
"आपल्या भेटीकरिता !"
वं. तुकडोजी महाराजांच्या वाणीतून बंधूप्रेमाचा व वात्सल्याचा गोडवा ओसंडत होता आणि दोघेही एकमेकास आत्मवतदृष्टीने सारखे पहात होते.
"माझ्या जवळ काय आहे बाबा?"
"अहो ! त्या श्रीसद्गुरू नाथांची पूर्ण अमानत जमा आहे तुमच्या जवळ ! तुम्हास काही कमी नाही या त्रिखंडात !"
एवढे बोलून दोघांनीही परस्पर मनोभावे वंदन केले. श्रीसमर्थ लहानुजी महाराज राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजासी सरळ व सहज बोलत असे. कुशल विचारीत असे. त्यांची नित्याची स्थिती त्यावेळेस रहात नसे हे त्यांचे बंधुप्रेम. श्रीसंत तुकडोजी महाराज निघून गेले की, पुन्हा बाबा पूर्ववत स्थितीत यायचे.
"अहोपण ! आपला होता तो तर निघून गेला. आपले कसे काय होईल ?" लहानुजी महाराज म्हणाले. आत्मस्थितीत गढून गेलेला महापुरूषही राष्ट्राची चिंता बाळगतो. वरील शब्द गांधी खुना विषयी होते.
"तुम्ही सांगाना काय करावं आपण तर?"
"काही नाही, ह्या सर्व देशाचा कारभार व व्याप तुमचेच खांद्यावर आहे. हे सर्व तुम्हाला सांभाळावं लागणार आहे !"
"माझेकडून कसे सांभाळणे होईल बाबा ?"
"अहो ! ते सर्व होते. त्या सद्गुरूची मोठी कृपा आहे तुमच्या पाठीमागे. अन् हेच नव्हे तर तुम्ही दुरपर्यंत दिवे लावाल !"
"होय बाबा ! आपणा दोघांचेही पाठिमागे सद्गुरूनाथ सदैव उभे आहेत." श्रीलहानुजी महाराजांनी व राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांनी परस्परास प्रणाम
केला. राष्ट्रसंतांनी कडूकडे भोजन केले व विश्रांती करून निघून गेले.
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, "जपानसारख्या पाश्चात्य देशात मी विश्वधर्म व विश्वशांती परिषदेस जाईन हे मला स्वप्नातदेखील आठवत नव्हते. ही सर्व सद्गुरूनाथांची कृपा !"
राष्ट्रसंत विश्वधर्म परिषदेमध्ये गेल्यावरत भारतवर्षाचे नाव चीरस्थाई करून ठेवले आणि अठरा देशाच्या विश्वधर्म परिषदेचे प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्त झाले. राष्ट्रसंतांचे विश्वसंत बनले. सन १९४८ मधील श्रीलहानुजी महाराजांचे वचन सन १९५५ मध्ये सत्य झाले.
संदर्भ :- जीवन - दर्शन

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा