लहानुबाबा दीन दु:खीतांचे कैवारी
दुःखीतांचे कैवारी
श्रीसमर्थ लहानुजी महाराजामध्ये सद्गुरू कृपेने आत्मज्ञानाची फळे यायला लागली. निष्काम सेवेने जनप्रिय झाले. "जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी, तेणे पथ्य सांभाळावी" आहे मन निर्विकारी झाले. चित्तचतुष्ट निरोधन केले. आत्मरत वृत्ती झाली. जगती जनार्दन ।। दिसायला लागला. दीनदुःखीतांच्या क्लेशात सहभागी व्हायला लागले. गंगापूर । क्षेत्री वनौषधी देऊन कित्येकांना व्याधी मुक्त केले. त्यात धन्यता वाटायला लागली. संतांची पायवणी घेण्यास जनमनाची लाज मानली नाही. शरीर कष्टवून जेवढा परोपकार करणे शक्य होईल तेवढा परोपकार करायचे. देवपूजा, राऊळी परिक्रमा, एकादशी करणे, व्रत उद्यापनासारखे धार्मिक विधिकृत्ये कमी झाली. उलट मंदिराकडून कोणी जाणारा पांथस्थ भेटला तर त्याची विचारपूर करायचे. त्याचे जवळ ओझे असेल तर ते आपणाकडे घेऊन त्यांचा भार हलका करायचे. आपलीच स्वतःची धड सोय नाही, पायही लांब होऊ शकत नाही एवढी जागा, पण त्या मर्यादित कुटिचे गंगापूर स्थळी पथिकास ते आसरा द्यायचे. प्रवाशास कुणाचे घर पाहिजे असेल तर ती व्यवस्था करायचे. सोय नसेल तर आपणाकडे आश्रय द्यायचे. ते म्हणायचे की, प्रत्येक माणूस पाहुणा आहे. "दिन चार घडीका जीना, दुनिया है मुसाफिर खाना" ते. (राष्ट्रसंत) शेवट हेच नव्हे तर कुणी वाटसरू चालून दमला त्याला विसावा द्यायचे. भुकेल्यास अन्न, तृषितास पाणी, निराश्रितास आश्रय व दुःखितास अभय हे या झोपडीत व जंगली क्षेत्रात गंगापूर स्थळी मिळायचे. कुणी सांगितलेच तर सभोवतालची शेती सांभाळायचे. गुरे हाकायचे.
अद्भूत असे कार्य जेव्हा समर्थांचे घडायला लागले तेव्हा लोक यांचे चरणं घराला लागावी म्हणून प्रयत्न करीत होते. कडूकडे यायचे अगोदर ते प्रथम एकदिडवर्षे बळीरामजी खोडके यांचेकडे बैठकीत राहात होते. तिथे त्यांच्या जवळ रडकी अर्भक बायांनी आणून ठेवावी व त्यांनी आपला घरातील कामधंदा करावा. यांनी वेडावलेल्या स्थितीतही ती मुलं सांभाळावी. कुणी गाईची धार काढून मागावी ती काढून द्यावी. थोरपुरूष आपला थोरपणा जगात दाखवायला तयार नसतात.
"चातुर्य लपवी । महत्व हारवी । पिसेपण मिरवी । आवडीने" (ज्ञानेश्वरी)
त्यामुळे काही लोक चांगल्या दृष्टिने पहात नव्हते. कुणी रिकामटेकडा म्हणू त्यांचा उपयोग करून घ्यायचे. पण बाबा हे समजत होते की,
"राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे ।" (तुका.)
नाहीतर आज कोण तयार आहे विनामूल्य श्रमायला? पण हा टाकरखेडचा विश्ववंद्य वेडा ते परोपकारमय कार्य मोठ्या आवडीने करायचा.
उणे दिसे ते पूर्ण करी। जगाचा तोल बोधे सावरी। परंतु केल्याचा स्पर्शची नसे अंतरी । चमत्कारी संत ऐसे ।। - ग्रामगीता
ते कार्यात् चमत्कार समजत होते. निष्काम भावनेने त्यांचे कार्य चालू होते.
ते या गीतावचनाप्रमाणे-
"कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।" (गीता)
शेवटी विमलभाव खूप वाढला. परोपकार करण्याची प्रवृत्ती इतकी पराकोटिला गेली की, त्यांना "अपना ही जैसा जीव है, वैसा सभिको देखना" (राष्ट्रसंत) याप्रमाणे भावना दृढ झाली. गंगापुरच्या आल्हाददायक स्थळी पशूपक्षीसुध्दा रमायला लागले. मुक प्राण्यांची भाषा सुध्दा कळू लागली. "अवघी भूते साम्या आली, कई म्या देखिली डोळा" (तुका.) कुणी पावसात भिजला तर त्याला वस्त्र, भुललेल्यास व भटक्यास विसावा या सुदामाच्या झोपडीत मिळत असे. परंतु ह्या सर्वकार्यात त्यांना काही विशेष वाटत नव्हते. विशेष म्हणजे गावातल्या भाकड गाई आणि निरूपयोगी बैलांचीसुध्दा ते सेवा करायचे. "मुंगी आणि राव, आम्हा सारखाची जीव" (तुका.)
समाजही उलटच असतो. गावात कुणी भिक्षुक, गोसावी, दीन, दरिद्री, दुःखी आला तर त्याला गंगापूरला पाठवयाचे, लोकांच्या या पाठविण्यात खोचटपणा होता. पण समर्थ त्या आलेल्या योगाला शुभ वेळा समजायचे, परमभाग्य मानायचे. अतिथी व निराश्वितांची सेवा ते देव म्हणून करायचे, त्यांना देव दगडापेक्षा माणसात दिसायला लागला. दामापेक्षा घामात दिसायला लागला. वर्धेवरून डोक्याने पाणी लोकांना दिवसभर पाजायचे पण त्रास मानला नाही. सानथोरांचा विचार केला नाही. उणे पडेल तेथे स्फूर्तीने व नम्रतेने हातभार लावायचे. नावाने लहानू पण कार्याने फार मोठे. असे नाव समर्थ करीत होते. दुष्काळाचे वेळी सुध्दा या महापुरूषांनी जनतेला फार मोठा साथ व धीर दिला. राष्ट्रसंत त्यांचे थोरपण सांगतात….
भारी बडा है तू पर, लहानुजी कहावे ।
दुनिया ही जानती है, तेरा तुहि बतावे ।।
हळूहळू समाजात महाराजाबद्दल श्रध्दा व प्रेम निर्माण होऊ लागले
जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले ।।
तोची साधू ओळखावा । देव तेथेची जाणावा ।।
निष्कामसेवा म्हणजेच वैराग्य परमावस्था, पुण्यपुरूष ईश्वरोपासक असून सुध्दा त्यांनी आत्मबळावर व सेवेच्या महान कार्यावर समाजाची घडी भक्तीने व सेवेने आकर्षित करून नीट बसविली असते.
संदर्भ :-
श्री संत लहानुजी महाराज जीवन - दर्शन

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा